भोर मार्गे कोकणात उतरायला असलेल्या वरंधा ह्या घाट मार्गावर असलेला, अगदी मोक्याच्या जागी उभारलेला मात्र सद्य स्थितीत अगदी बिकट परिस्थितीत असलेला एक बलदंड दुर्गरत्न म्हणजे कावळ्या किल्ला. पुरातन घाट वाटांच्या संरक्षणासाठी किल्ला उभारताना त्याचे भौगोलिक स्थान किती गरजेचे असते, हे कावळ्या किल्ल्यास भेट दिल्यावर समजते.
वरंधा घाटामध्ये “वरंधा घाट पॉईंट” नावाची एक जागा आहे. पावसाळ्यामध्ये अनेक हौशी पर्यटक येथे येत असतात. इथुन वरंधा घाट मार्गातील दरीचे, धबधब्याचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. डाव्या हाताला वाघजाई देवीचे छोटेसे मन्दिर आहे. इथे भरपूर माकडे असल्यामुळे ह्या जागेला “मंकी पॉईंट” असेही म्हणतात. इथपर्यत पक्का डांबरी रस्ता असून कावळ्या किल्ला इथून स्पष्ट दृष्टीस येतो. डाव्या हाताला लांबलचक पसरलेली जी डोंगराची सोंड दिसते तोच आहे कावळ्या किल्ला.
मंकी पॉईंटच्या डाव्या हाताला ५-१० पक्क्या बांधलेल्या पायऱ्या दिसतात आणि पुढे एक छोटीशी पायवाट दिसते. हीच पायवाट सरळ कावळ्या गडाच्या पहिल्या पठारावर घेऊन जाते. कावळ्या गडावर जाताना चढण जास्त नाही मात्र सरळ चालणे जास्त आहे. विशेषतः हि पायवाट जपून चालावी. उजव्या हाताला डोंगराचा अजस्त्र कडा, डाव्या हाताला वरंधा घाटाची खोल दरी आणि केवळ तळपायच समावू शकेल एवढी छोटी पायवाट. पावसाळ्यामध्ये चिखलामुळे हि पायवाट जास्त निसरडी होऊ शकते आणि दुतर्फा कम्बरभर उंचीचे गवत असल्यामुळे डाव्या बाजूला असलेल्या दरीच्या खोलीचा अंदाज घेणेही अवघड होते.
सुमारे तासाभरात आपण डोंगराच्या कड्याला वळसा मारून एका विस्तीर्ण पठारावर पोहोचतो. हाच आहे कावळ्या गडाचा गडमाथा. इथून किल्ल्याच्या प्रचंड विस्ताराचा अंदाज येतो. पठारावर पोहोचल्यावर डावीकडे लांबवर पसरलेली माची आपले लक्ष वेधून घेते. थोडीशी चढण आणि बराचसा सपाट रस्ता असे अजून सुमारे अर्धा-पाऊण तास पायपीट करून आपण माचीच्या टोकावर पोहोचतो. ह्या रस्त्यामध्ये एका ठिकाणी पुरातन दगडी बांधकामाच्या चौथऱ्याचा चौकोनी पाया आढळतो. कधीकाळी ह्याच मजबूत दगडी पायावर एखादी इमारत उभी असेल. किल्ल्याचे अस्तित्व सिद्ध करणारा हा एक अवशेष गडावर शिल्लक आहे. तसेच नजीकच्या काळात झालेल्या गड-संवर्धनकार्यामुळे काही पाण्याच्याटाक्या देखील समोरआल्या आहेत. मात्र ह्या व्यतिरिक्त गडावर कोठेही तटबंदी-बुरुजाच्या खुणा किंवा एखादे छोटेसे देवाचे मंदिरही आढळत नाही. गडावर फारकाही अवशेष नसल्यामुळे वरंधा घाटातील मंकी पॉईंट पासून कावळ्या गड पाहून परत यायला सुमारे दोन-अडीज तास पुरतात. इतिहासातही कावळ्या गडाचा कोठे काही संदर्भ आढळत नाही.
एखाद्या किल्ल्याचा इतिहास जरी अन्यात असला तरी सद्यस्थितीमध्ये किल्ल्याचा भूगोल समजून घेणे देखील इतकेच महत्वाचे आहे. कावळ्या गडाच्या डाव्या माचीच्या उंच सोंडेवर पोहीचल्यावर गडाचे भौगोलिक महत्व समजते. वरंधा घाटाचा पूर्ण उतरणीचा मार्ग, दूरवर पसरलेला कोकणाचा भूभाग आणि आकाश निरभ्र असल्यास तोरणा आणि राजगड हे स्वराज्यातील दोन प्रमूख किल्ले कावळ्या गडावरून स्पष्ट दिसतात. शिवपूर्व काळापासून वापरात असलेल्या वरंधा घाट मार्गावर कावळ्यासारखी भेदक नजर रोखण्याचे काम ह्या कावळ्या गडाने केले आहे. आज कावळ्या गड बिकट स्थितीत जरी असला तरी कधी काळी वरंधा घाटातून येणाऱ्या शत्रूच्या मनात धडकी भरवण्याचे काम ह्या बलदंड व्दारपालाने केले आहे हे विसरून चालणार नाही. फारसे अवशेष जरी शिल्लक नाही, निसरडी अवघड बारीकशी पायवाट आहे, कम्बरभर उंचीचे काटेरी गवत आहे तरीही कावळ्या किल्ला हे एक ऐतिहासिक स्मारक आहे हेही विसरून चालणार नाही. हाती पुरेसा वेळ असल्यास वरंधा घाटाखाली असलेले श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले शिवथरघळ हे निसर्गरम्य सुंदर ठिकाण देखील अवश्य बघावे.