महाराष्ट्रातील किल्ल्यांचे प्रामुख्याने चार भागात वर्गीकरण करता येईल. गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग आणि वनदुर्ग. कमळगड हा या पैकी वनदुर्ग प्रकारातील. महाबळेश्वरच्या आजूबाजूला असलेल्या जावळीच्या अरण्यातील प्रतापगड किल्ला तर बऱ्याच लोकांना माहित आहे. पण ह्याच भागात कमळगड, पांडवगड, मधु मकरंदगड, केंजळगड असे अनेक दुर्गरत्न आहेत.
पुणे आणि सातारा दोन्ही शहरापासून कमळगड किल्ल्याला एका दिवसात भेट देणे सहज शक्य आहे. कमळगडला जाण्यासाठी पुणे सातारा महामार्गावरील वाई ठिकाणी यावे. येथून साधारण ४० किमी वर वासोळे गाव आहे. ह्या गावातून एकामार्गाने कमळगडावर जाता येते. हि वाट सोपी आहे मात्र गडावर जायला साधारण तीन तास लागतात. इथपर्यत एसटी ची सोय आहे. जर स्वतःचे वाहन असेल तर वासोळे पासून थोडे पुढं तुपेवाडी गावात यावे. येथूनही एक रस्ता आपल्याला गडावर घेऊन जातो. हा रस्ता वासोळे गावातील रस्त्यापेक्षा तुलनेने अवघड पण कमी वेळात गडावर घेऊन जातो. येथून गडावर जायला साधारण दीड-दोन तास लागतात.
तुपेवाडी गावातून किल्ल्याची उभी चढण चांगलीच दमछाक करणारी आहे. रस्त्यात आपल्याला अनेक औषधी वनस्पती दिसतात. तसेच ह्या मार्गावर अनेक चकवे असल्याने कोणीतरी माहीतगार व्यक्ती सोबत असावा. मी जेव्हा कमळगडाला पहिल्यावेळी भेट दिली होती तेव्हा मी इथून उतरताना रस्ता चुकलो होतो. सुमारे तासाभराची चढण सम्पल्यावर आपण डोंगराच्या सपाट पठारावर येतो. येथे दिशाभूल होऊ नये म्हणून किल्ल्याच्या नावाचा दिशादर्शक फलक लावला आहे. त्यानुसार पठारावरून डाव्या बाजूला किल्ल्याकडे चालू लागावे.
इथून खऱ्या अर्थाने किल्ल्याच्या अरण्यात आपण प्रवेश करतो आणि दुतर्फा असलेल्या घनदाट उंच झाडांमधून आपला प्रवास सुरु होतो. येथील जावळीच्या जंगलाच्या थंडगार आल्हाददायक सावलीमुळे मागील खड्या चढणीचा शीण निघून जातो. थोड्याच वेळात आपण गोरक्षनाथाच्या मंदीरापाशी पोचतो. मंदिर सुस्थितीत आहे आणि बाहेर पत्र्याचे शेड बांधले असून येथे सुमारे पंधरा वीस लोकांचा मुक्काम सहज शक्य होऊ शकतो. मंदिरात दर्शन घेऊन परत आधीच्या मळलेल्या पायवाटेने चालतं रहावे. थोड्या वेळात आपल्याला एक उत्तम स्थितीतील घर दिसून येते. हि किल्ल्याच्या जवळ असलेली एकमेव लोकवस्ती. येथे देखील मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते.
आता इथून कमळगडाचा गडमाथा अगदी जवळ आहे. ह्या घराच्या समोरची पायवाट आपल्याला घनदाट झाडीतून थेट गडावर घेऊन जाते. रस्त्यात तटबंदीचे थोडेसे अवशेष दिसून येतात. काही ओबड धोबड पायऱ्या चढून आपण एका लोखंडी शिडीने गडमाथ्यावर आपण प्रवेश करतो. गडमाथा तसा छोटाच पण येथून गडाच्या भोवतालचे अरण्य स्पष्ट दिसू शकते. खरेतर कमळगड किल्ल्याच्या भौगोलिक स्थितीमुळे किल्ल्याला एका अर्थी नैसर्गिक अभेद्यता लाभली आहे. गडाला पूर्ण पणे वळसा मारून गडाच्या तिन्ही बाजूने खेळले आहे कृष्णा नदीचे पात्र आणि एका बाजूने आहे वाळकी नदीचे पात्र. म्हणजे कमळगड किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी शत्रू कोणत्याही बाजूने आला तरी त्याला एक मोठे नदी पत्र नक्कीच ओलांडावे लागणार. नदी ओलांडल्यानंतर सुरु होते घनदाट जावळीचे अरण्य आणि गडाची उभी चढण. ह्या घनदाट जंगलामध्ये मोठे सैन्य घेऊन येणे, त्यांची निवारा आणि अन्न-पाण्याची व्यवस्था करणे फार कठीण काम. छोटीशी चिंचोळी वाट आणि मुरुमाड मातीची चढण अशा वाटेने शत्रूकडे असलेले हत्ती, उंट सारखे मोठाले प्राणी काहीच उपयोगी नाहीत. आणि अखेर गडाच्या चहुबाजूने असलेले सरळसोट कातळकडे. हे घनदाट अरण्य, चहुबाजूने असलेले विस्तीर्ण नदी पात्र आणि सरळसोट कडे म्हणजे एका अर्थी गडाला लाभलेले नैसर्गिक संरक्षणच.
गडावर सद्यस्थितीला पाहण्यासारखे फार काही नाही. बुरुज तटबंदीचे अवशेषही दिसत नाहीत. मात्र कमळगडावर असलेली एकमेव अद्वितीय पुरातन वास्तू म्हणजे गडावर असलेली कावेची विहीर. एक अतिशय सुंदर विहीर, पुरातन काळातील जलसाठ्याचा एक उत्तम नमुना. गडमाथ्यावर पोहोचल्यावर मधोमध एक मोठा खड्डा असल्या सारखा दिसतो. जवळ गेल्यावर दिसते कि येथे खाली उतरायला पठारावरून सरळ ५०-५५ पायऱ्या खोदल्या आहेत. ह्याच पायऱ्या आपल्याला ह्या कावेच्या विहिरीमध्ये घेऊन जातात. आपण जणु डोंगराच्या पोटातच जात आहोत असा भास होतो. गडमाथ्यावर सर्वत्र काळी माती आहे पण ह्या विहीरीमध्ये आत सर्वत्र लाल कावेची माती दिसून येते. हळू हळू आत जाताना अतिशय थंडावा जाणवतो. कोण ते महान स्थापत्यकार असील ज्यांनी एवढ्या उंचीवर, घनदाट जंगलाच्या मधोमध असलेल्या भूगर्भातील जलसाठ्याला बाहेर आणण्यासाठी ह्या सुंदर वास्तूची निर्मिती केली असावी. ह्या कावेच्या विहिरीमुळे कमळगडाचे सौन्दर्य शतपतीने वाढले आहे.
कमळगड किल्ल्यावरून जावळीच्या जंगलाचे सुंदर दृश्य दिसते. पाचगणी आणि महाबळेश्वर डोंगररांग देखील इथून स्पष्ट नजरेस येते. महाबळेश्वराच्या माथ्यावरून सुरु होणाऱ्या अनेक घाटवाटांवर देखरेखीसाठी कमळगड किल्ला हि एक उत्तम मोक्याची जागा होती. तसेच रोहिड मावळातील रोहीडा किल्ला, वाई जवळील पांडवगड आणि केंजळगड हे किल्ले देखील इथून स्पष्ट दिसतात. जावळीच्या खोऱ्यातील अरण्य अनुभवायला, वनदुर्गाचे सौन्दर्य पहायला आणि इतर कोठेही न दिसणारी अद्वितीय कावेची विहीर बघायला कमळगड किल्ल्यास प्रत्येक दुर्गप्रेमीने एका तरी नक्की भेट द्यावी.