पुणे शहराच्या जवळपास सुरु झालेली भुलेश्वराची पर्वतरांग सातारा शहराजवळ संपते. ह्या पर्वतरांगेपासून विलग झालेल्या एका छोट्या डोंगरावर वसलेला आहे कल्याणगड किल्ला. किल्ल्यावर असलेल्या दत्तमन्दिरामुळे आणि नन्दगीरी महाराजांच्या समाधीमुळे किल्ल्याला भाविक बऱ्यापैकी भेट देतात. होळी पौर्णिमेच्या आधी गडावर उत्सव देखील असतो.
कल्याणगड किल्ल्यास भेट देण्यासाठी सातारा मार्गे प्रस्थान करावे आणि हायवे वरून भुईंज गावावरून शिवथर कडे जाणार रस्ता पकडावा. भुइंज पासून साधारण तीस किलोमीटर वरती साधारण तासाभराच्या प्रवासावर कल्याणगड किल्ला स्थित आहे. किल्याची उंची जास्त नाही आणि नजीकच्या काळात किल्ल्याचे एका धार्मिक स्थळात रूपांतर झाल्यामुळे वरपर्यत जाण्यासाठी कच्चा गाडीमार्गही उपलब्ध आहे. ह्याच गाडी मार्गावर आम्हाला अनपेक्षितपणे एक लांडोरही दिसला होता. गाडीमार्ग सम्पल्यावर काही तुरळक पायर्यांची चढण चढून आपण गडमध्ये प्रवेश करतो.
गडमध्ये प्रवेश करण्यासाठी एकामागोमाग एक अशा दोन प्रवेशद्वाराची बांधणी दिसते. प्रवेशद्वारावर कमळ, गणपती अशी शुभचिन्हेही आढळतात. प्रथम प्रवेशद्वाराने आत गेल्यावर गडावर जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते मात्र आधी जरा डावीकडे थोडेसे वळूयात. डाव्याबाजूला वळून थोडेसे खाली उतरल्यावर सुमारे १५-२० फूट अशी लांब गुहा आढळते आणि ह्याच गुहेमध्ये दत्तमंदिर आणि जैन तीर्थंकर श्री पाश्वर्नाथांची मूर्ती आहे. गुहेमध्ये लख्ख काळोख आहे त्यामुळे टॉर्च जवळ ठेवावा. गुहेची उंची आत गेल्यावर एकसलग नाही त्यामुळे डोकेही सांभाळावे. गुहेमध्ये पावसाळ्याच्या दिवसात कम्बरभर उंचीचे पाणी जमा होते. तरी अशा काळोखात आणि पाण्यातून सावधगिरीने चालत आत गेल्यावर गुहेच्या शेवटी सुंदर सुबक दत्त मूर्ती दिसते. दत्त मूर्तीच्या उजव्या बाजूसचं श्री पाश्वर्नाथांची मूर्ती आहे.
समाधी मन्दिर पाहून परत प्रथम दरवाजापाशी यावे आणि उजवीकडे गडमाथ्याकडे चालावे. पायऱ्या असल्यामुळे हि चढणही सोपी आहे. थोड्याच वेळात आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी येतो. हे द्वार उजव्या वळणाचे गोमुखी पद्धतीचे आहे. समोर गेल्यावरच हनुमानाचे सुंदर मन्दिर दिसते. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर कळसावर नागाचा फणा आहे.
मन्दिरासमोरीलच रस्ता आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातो. ह्यासम्पूर्ण चढणीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर समोरच एक समाधी सदृश्य बांधकाम दिसते. हि समाधी रामदास स्वामींचे आवडते शिष्य कल्याणस्वामींची आहे अशी आख्यायिका आहे आणि ह्यावरूनच गडाचे नाव कल्याणगड पडले असावे. इथूनच गडफेरी सुरु होते. गडमाथा फारसा जास्त नसल्याने अर्धा तास पुरेसा होतो. माथ्यावर काही नवीन बांधणीचे सिमेंटचे बांधकाम दिसते. कदाचित गडावरील जत्रेसाठी बांधलेले असावे.
समाधीच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाके आहे. थोडे अजून चालत पुढे गेल्यावर अजून एक समाधीवजा बांधकाम दिसते जिथे एक शिवपिंड ठेवलेली आहे. काही ठिकाणी जुन्या बांधकामाची जोती दिसतात. जिथून गडमध्ये प्रवेश होतो त्याच्या विरुद्ध ठिकाणी काही तटबंदीचे अवशेष आहेत. गडावर एक कबरही दिसते.
गडावर एकूण तीन पाण्याची मोठी टाकी आहेत पण पाणी पिण्यायोग्य नाही. गडावर असलेली घरांची जोती, पाण्याची केलेली मुबलक सोय, एकामागे एक अशी बांधलेली दोन भक्कम प्रवेशद्वारे, चौफेर तटबंदी या सर्वांवरून कल्याणगड किल्ल्यावर पूर्वीच्या काळी मुबलक प्रमाणात लोकांचा राबता असावा आणि हा एक महत्वाचा किल्ला असावा असे वाटते.
अशा प्रकारे गडफेरी सम्पवून पुन्हा समान मार्गाने खाली मार्गस्थ व्हावे. उपलब्ध गाडीमार्ग आणि अतिशय सोपी चढण असल्याने स्त्रिया, लहान मुलांना घेऊनही कल्यानगडाची एक छानशी कौटुंबीक सहल आयोजित करता येईल.
