पुणे शहराजवळील ताम्हिणी घाट म्हणजे हौशी पर्यटकांना निसर्गाचा आस्वाद देणारी एक उत्तम जागा. इथे असणारे मोठाले डोंगर, घनदाट झाडी, अनेक छोटे-मोठे धबधबे, मुळशी धरणाचे विस्तीर्ण पात्र हे सर्व अनुभवायला विशेषतः पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटकांची रेलचेल असते. येथील डोंगररांगांमधून कोकणात उतरायला ताम्हिणी घाटाच्या बरोबरीने इतर काही लहान पुरातन घाटमार्ग अस्तित्वात होते जे सध्या वापरात नाहीत. अशा घाट मार्गांवर देखरेखीसाठी इथे काही किल्ले उभारले गेले आणि त्यांपैकी एक आहे कैलासगड. कैलासगड किल्ल्याला येथील स्थानिक रहिवासी घोडमांजरीचा डोंगर असेही म्हणतात.
पुणे शहरापासुन कैलासगड एका दिवसात पाहुन होतो. मात्र मुंबई शहरातूनही पहाटे लवकर निघाल्यास लोणावळा मार्गे कैलासगडला एका दिवसाची दुर्गदर्शनाची मोहीम सहज शक्य आहे. लोणावळा शहरातून कोरीगड किल्ल्याकडे जाणार रस्ता पकडावा आणि सहारा सिटीच्या आधी बांबुर्डे-वडुस्ते गावांकडे जाणारा फाटा पकडावा. वडुस्ते गाव सोडून एक-दोन किलोमीटर पुढे गेल्यावर दोन डोंगरांच्या मधोमध एका छोट्या खिंडीमध्ये आपण पोहोचतो. पुणे शहरातून येताना ताम्हिणी घाटामधून भादसकोंडेगाव मार्गे हि खिंड गाठता येते. मुंबई पासून अंतर आहे सुमारे १४० किमी आणि पुणे शहरापासून सुमारे ८० किमी. खिंडीच्या रस्त्याच्या कडेला एक ट्रान्सफॉर्मर बसवला आहे. त्याखालीच कैलासगड किल्ल्याचा फलक बसवला आहे. ट्रान्सफॉर्मरच्या समोरच एक छोटीशी पायवाट दिसते जी आपल्याला थेट गडावर घेऊन जाते. ट्रान्सफॉर्मरची खुण लक्षात ठेवावी म्हणजे कैलासगडाचा रस्ता हमखास सापडेल.
ह्या पायवाटेने जाताना आधी एक छोटीशी टेकडी लागते. ती चढुन उतरल्यावर कैलासगडाची मुख्य चढण सुरु होते. रस्ता फारसा अवघड नाही मात्र कैलासगडाचा डोंगर पूर्णपणे गवताळ असल्याने वाटेमध्ये फारशी सावली लाभत नाही. वाटेत कोठेही पाणि देखील उपलब्ध नसल्याने जवळ पुरेसे पाणि असणे आवश्यक आहे. सुमारे दीड तासाच्या चढणीनन्तर कैलासगडाच्या माथ्यावर आपण पोहोचतो. येथे उजव्या हाताला थोडेसे पठार असुन तेथे भगवा ध्वज भरलेला दिसतो आणि डाव्या हाताला गडाचा मुख्य विस्तार दिसतो.
गडमाथ्याच्या मधोमध एक छोटेसे टेकाड दिसते. टेकाडाच्या थोडे आधी डाव्या हाताला एक छोटीशी पायवाट खाली उतरलेली दिसते. ह्या पायवाटेने पाच मिनिटे थोडे खाली उतरल्यावर डोंगराच्या कपारीमध्ये खोदलेले एक प्रशस्त पाण्याचे टाके दिसते. हा गडावर असलेल्या एकमेव पाण्याचा स्रोत. हे पाणी पिण्यायोग्य आहे मात्र टाक्यामधील पाणी जास्त न ढवळता वरवरचे पाणी हळुवार काढून घावे. नाहीतर तळाशी जमा झालेला मातीचा गाळ उचंबळून वर येईल आणि पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. पाणी पिऊन, ताजेतवाने होऊन ज्या पायवाटेने खाली आलो त्याच पायवाटेने गडमाथ्यावर जावे.
गडमाथ्यावर सर्वत्र गवत पसरले असल्यामुळे गडावर फारसे अवशेष दिसत नाही. मधोमध असलेल्या टेकाडावर काही पुरातन इमारतींच्या चौथाऱ्याचे अवशेष दिसतात मात्र ते देखील गर्द गवतात शोधावे लागतात. टेकडीच्या उजव्या बाजूला एका खडकावर कोरलेली शिवपिंड दिसते. सध्या ह्या शिवपिंडी भोवती दगडे रचून छोट्या भिंती उभारल्या मुळे गडमाथ्यावर हि शिवपिंडीची जागा सहज सापडते. बेवारस अवस्थेत उघड्यावर असलेली हि दुर्गदेवता पाहुन जरा वाईट वाटते. पावसाळा सम्पल्यावर कैलासगडला भेट दिल्यास मुळशी धरणाच्या जलाशयाचा सुंदर विस्तार दिसतो. कोरीगड, घनगड हे किल्लेही स्पष्ट दिसतात. हाताशी भरपूर वेळ असेल तर कैलासगडासोबत भादसकोंडे गावातील लेण्यादेखील नक्की पाहाव्यात.
कैलासगड हा केवळ एक घाटमार्गांवरील टेहाळणीचा गड असल्यामुळे कदाचित किल्ल्याचा फारसा विकास झाला नसावा. इतिहासामध्ये कैलासगडाचा उल्लेख १७०६ साली लिहिलेल्या एका पत्रामध्ये फक्त आढळतो. आज कैलासगड किल्ला फार कमी दुर्गप्रेमींना माहित आहे. ताम्हिणी घाटामध्ये पावसाळ्यात, हिवाळ्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांपैकी फार कमी जणांचे पाय कैलासगडकडे वळत असतील.