महाराष्ट्रामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या अनेक पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक नैसर्गिक संरक्षण म्हणवेच लागेल. ह्याच पर्वतरांगांमुळें कोकण भूप्रदेश आणि घाटमाथाच्या दरम्यान सह्याद्रीच्या डोंगर रांगांची नैसर्गिकरित्या संरक्षक भिंत निर्माण झाली आहे. पण जसजसे आपण सह्याद्रीची हि भिंत ओलांडुन कोकण किनारपट्टी कडे जाऊ लागतो तसतसे डोंगररांगांची उंची कमी जास्त होत जाते आणि मुळ डोंगररांगेपासून विलग झालेले काही छोटे मोठे डोंगरही दिसतात.
ह्याच भौगोलिक परिस्थितीचा फायदा करून मुलखावरील टेहळणी करता अशा छोट्या मोठ्या डोंगरावरही काही किल्ल्यांची बांधणी केली गेली. कर्जत शहराजवळील अशाच एका विलग असलेल्या छोट्या डोंगरावर आहे भिवगड किल्ला. ह्याच किल्ल्याला स्थानिक गावकरी भीमगड असेही म्हणतात. किल्ल्याची उंची आणि किल्ल्याचा विस्तार फार काही जास्त नाही. त्यामुळे पुणे आणि मुंबई दोन्ही शहरांपासून भिवगडला एका दिवसाचा दुर्ग दर्शनाचा बेत सहज आखता येऊ शकतो.
भिवगड किल्ल्याला भेट देण्यासाठी कर्जत शहर गाठावे. कर्जत पासुन सुमारे ४ किलोमीटर वर वदप आणि गौरकामत हि दोन छोटी गावे आहेत. ह्या दोन गावांजवळच बसला आहे भिवगड किल्ला. कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 4 च्या बाहेरून वदप गावात यायला तीन आसनी, सहा आसनी रिक्षाची सोय आहे. जर स्वतःचे वाहन असेल तर या दोन्ही गावापर्यंत पक्क्या रस्त्याने जाता येते.
वदप गावाजवळ असलेल्या धबधब्याला बरेच पर्यटक पावसाळ्यात भेट देत असतात. ह्याच धबधब्याकडे जायला मुख्य रस्त्यावरील जे वळण आहे ते मागे टाकून अजून थोडे अंतर पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक छोटा डांबरी रस्ता दिसतो. हाच रस्ता आपल्याला भिवगडकडे घेऊन जातो. सुरवातीला थोडासा डांबरी रस्ता आणि नंतर काहीशी चढण असलेली डोंगराळ पायवाट अशी सुमारे अर्ध्या तासाची चढण चढल्यावर एक छोटी खिंड समोर लागते.
येथे मुख्य पायवाटेला दोन फाटे फुटतात. डावीकडील रस्ता सुमारे पंधरा-वीस मिनिटांमध्ये भिवगड किल्ल्यावर नेतो. उजवीकडील वाट मावळ तालुक्यातील कामशेट जवळील ढाक बहिरी ह्या लेण्यांकडे जाते. हा सुमारे पाच-सहा तासांचा, पूर्णपणे अरण्यातील डोंगराळ मार्गाचा रस्ता आहे. ह्या मार्गाने काही हौशी दुर्गभटके ढाक बहिरी ते भिवगड हा मोठा ट्रेकही करतात. मात्र नवख्या लोकांसाठी ह्या मार्गावर सोबत वाटाड्या असणे गरजेचे आहे.
डाव्या बाजूच्या मार्गाने सुमारे अर्ध्या तासामध्ये भिवगड किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार सर्वकाही पूर्णपणे ढसाळल्यामुळे त्यांचे अवशेषही पहायला मिळत नाहीत. मात्र रस्त्यामध्ये असलेल्या खडकात खोदलेल्या दगडीपायऱ्या किल्ल्याचे पुराणत्व सिद्ध करतात. किल्ल्यावर एकूण तीन पुरातन खोदीव पाण्याच्या टाक्या दिसतात. गडमाथ्यावर पोहचल्यावर बरोबर गडाच्या मध्यभागी एका प्रशस्त बांधकामाच्या चौथाऱ्याच्या भिंतींचे अवशेष दिसतात. सोंडाई आणि इर्शाळगड हे दोन किल्ले देखील भिवगडावरून स्पष्ट दिसतात. भिवगड किल्ल्याच्या पायथ्याला वदप गावामध्ये एक मारुती मन्दिर आहे जिथे एक अतिशय दुर्मिळ अशी मिशी असलेल्या मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. ह्या मंदिराला देखील भिवगड किल्ल्याच्या भटकंती दरम्यान अवश्य भेट द्यावी.
भिवगड किल्ल्याचा इतिहासामध्ये कोठे प्रामुख्याने उल्लेख येत नाही. गणेश घाट हा पुरातन घाट मार्ग पूर्वी कर्जत ते भीमाशंकर प्रवासासाठी वापरात होता ह्या घाट मार्गावर देखरेखी साठी भिवगड किल्ल्याचा वापर होत असावा. तसेच गडावर असलेल्या अनेक खोदीव पाण्याच्या टाक्या, बांधकामाच्या चौथाऱ्याचे अवशेष ह्यावरून हे तर नक्की सिद्ध होते कि कोणेकाळी भिवगडावर मुबलक सैन्य-शिबंदी असावी. गडाचा इतिहास जरी सद्य स्थितीमध्ये अन्यात असला तरी एक ऐतिहासिक स्मारक म्हणुन भिवगडला नक्की भेट द्यावी. सुरवातीला उल्लेख केल्या प्रमाणे किल्ल्याची सोपी चढण आणि पुणे व मुंबई ह्या दोन्ही शहरांपासून जवळ असल्यामुळे भिवगडला एकदिवसीय दुर्ग दर्शनाची सहल सहज योजता येऊ शकते.