पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठी वसले आहे देहूगाव. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाधारण अध्यात्मिक महत्व देहूगावाला प्राप्त झाले आहे. कारण हीच ती पवित्र भूमी आहे जिथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला होता, इथेच ते वास्तव्याला देखील होते आणि देहूगावातूनच तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. देहूगावामध्ये इंद्रायणी काठी असलेल्या पवित्र गाथा मंदिराला तसेच देहूगावातील विठ्ठल मंदिर, संत चोखामेळा मंदिराला अनेक भाविक भेट देत असतात. ह्याच देहूगावापासून सुमारे ६ किलोमीटर वर आहे भंडारा डोंगर. देहूगावातील गाथा मंदिराचे दर्शन घेतल्यानन्तर अनेक भाविक भंडारा डोंगराला देखील अवश्य भेट देतात.
हा भंडारा डोंगर म्हणजेच संत तुकाराम महाराजांची एकांतात बसून विठ्ठलाचे ध्यान करण्याची आवडती जागा. आजमितीस भंडारा डोंगरावर सुंदर असे तुकाराम महाराजांचे मंदिर उभारले आहे. पायथ्यापासून उत्तम प्रशस्त डांबरी रस्ता असल्यामुळे डोंगर चढणीचा त्रास वाचतो आणि आपण थेट संत तुकाराम मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरामध्ये संगमरवरापासून घडवलेली तुकाराम महाराजांची तेजस्वी मूर्ती स्थापन केली आहे. त्या सोबतच विठ्ठल-रुख्मिणी, गणपती आणि शिवपिंडीची हि स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या आसपासही अनेक छोटया मूर्ती, समाधी सदृश्य स्मारके आणि दुर्मिळ अशी गरुडमूर्ती ठेवलेली दिसते. देवस्थानतर्फे इथे अनेक धार्मिक सोहळे साजरे केले जातात तसेच उपस्थित भाविकांना महाप्रसादाचीही सोय केली जाते.
मात्र ह्या सर्व अध्यात्मिक संदर्भांसोबतच भंडारा डोंगराने आपल्या पोटामध्ये एक छोटेखानी व सुंदर असे लेणीशिल्प देखील जतन करून ठेवले आहे. ते म्हणजे भंडारा डोगराच्या साधारण मध्यभागी असलेला मात्र भाविकांमध्ये काहीसा अपरिचित असलेला एक छोटासा बौद्धकालीन लेणी समूह. भंडारा डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर तुकोबारायांचे दर्शन घेऊन लेणी समूहाकडे जाणारी वाट पकडावी. मात्र डोंगरावरून हि वाट सापडणे नवख्या व्यक्तीला काहीसे कठीण आहे कारण कोठेही या लेण्यांचा नामनिर्देश करणारा बोर्ड लावलेला नाही. डोंगरावर विजेची सोय केलेली आहे आणि वर असलेल्या अनेक विजेच्या खांबांमध्ये विजेचा मुख्य डीपी सर्व प्रथम शोधावा. देवस्थानाच्या माणसांकडे किंवा डोंगरावरील दुकानदारांना विचारावे. ह्या डीपीच्या बाजूनेच एक छोटीशी पायवाट डोंगरावरून खाली उतरताना दिसते. ह्या पायवाटेने सोप्या उतरणीच्या मार्गाने सुमारे १५-२० मिनिटे चालत गेल्यास आपण थेट कातळातील कोरीव बौद्ध लेणीसमूहांपाशी पोहोचतो. तीन छोटेखानी विहार, एक स्तुप आणि दोन पाण्याच्या टाक्या येथे खोदलेल्या आढळतात. येथील प्रथम विहार जास्त प्रशस्त असून इथे एक छोटीशी विठ्ठल मूर्ती स्थापन केली आहे. वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी इथे वास्तव्यास असतात. विहाराच्या आतही दोन प्रशस्त खोल्या बांधलेल्या दिसतात आणि यांवरून असा तर्क लावता येईल कि हे विहार म्हणजे तत्कालीन साठवणुकीचे कोठार असावे. विहाराच्या समोरच एक पाण्याचे टाके खोदलेले दिसते.
विहाराच्या समांतर पुढे थोडे अंतर चालल्यास थोड्याश्या उंचावर मध्यम आकाराचा स्तूप आणि अजून एक छोटे विहार दिसते. थोडेसे सोपे कातळारोहण करून स्तूपाच्या जवळ आणि विहारामध्ये प्रवेश करता येतो. स्तूपाच्या मध्यभागी गोलाकार असे चौकटीचे नक्षीकाम केलेलं आहे. स्तूपाच्या पायथ्याला देखील अजून एक पाण्याचे टाके खोदलेले दिसते. समांतर पायवाटेने थोडे अंतर पूढे गेल्यावर अजून एक छोटासा विहार दृष्टीस येतो. ह्या विहाराच्या चौकटीपाशी आधीच्या काळी लाकडी दरवाजांचे कडी-कोयंडे लावण्यासाठी खोदलेले दगडी छिद्र देखील आढळतात. पाण्याच्या दोन टाक्या, तीन विहारे यांवरून असा तर्क लावता येईल कि या लेणीसमूहामध्ये बरेच बौद्धधर्मप्रसारक, प्रवासी मुक्कामास येत असावे.
आजमितीस भंडारा डोंगरावरील तुकोबारायांच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तगण येत असतात. मात्र यांपैकी फारच कमी जणांचे पाय लेणी समूहाकडे वळत असावेत. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत भंडारा डोंगराला अवश्य भेट द्यावी. हिरवागार शालू पांघरलेले भंडारा डोंगराचे सृष्टीसौन्दर्य आपल्याला नक्कीच मोहित करेल. येथे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच आपल्याला समजेल कि समस्त कोलाहलापासून दूर अशी शांत व सुंदर जागेची निवड तुकोबारायांनी ईश्वर चिंतनासाठी का निवडली असावी. कदाचित ह्याच विहारांमध्ये कधीकाळी संत तुकाराम महाराज देखील ध्यान-धारणेला बसले असावेत. इथेच कदाचित तुकोबाराय विठ्ठलाच्या भजन-कीर्तनात तल्लीन झाले असावेत. येथेच तुकाराम महाराजांनी गाथेमधील अभंगरचना केली असावी. त्यामुळे भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या दर्शनांनंतर ह्या लेणी समूहाला देखील आवर्जून भेट द्यावी.