भौगोलीक परिस्थितीचा वापर करून कमीत कमी सैन्यबळ असूनही जास्त सैन्यबळ असलेल्या शत्रूला नामोहरम करण्याची युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा. ह्या युद्धनीतीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना नामोहरम केले. आता जाणून घेऊयात अशाच एका अनोख्या युद्धाबद्दल जिथे गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून विजयश्री मिळवण्यात आली आणि विशेष म्हणजे हे युध्द घडले होते शिवाजी महाराजांचे तीर्थरूप, स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी निजामशाही, आदिलशाही आणि मोघल ह्या तीन राजसत्ता म्हणजे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. आपापला साम्राज्यविस्तार करण्याच्या हेतूने ह्या तिन्ही राजसत्ता नेहमीच एकमेकांविरुद्ध कुरघोडी करत असत. सुमारे इसवी सन १६२४ साली आदिलशाही आणि मोघल यांनी एकत्र येऊन निजामशाही पूर्णपणे संपवण्याची योजना आखली होती. आदिलशाहीची सुमारे ८०,००० ची फौज होती आणि त्यांना सामील झाली मोघलांची तब्बल १,२०,००० ची फौज. असा एकूण सुमारे दोन लाखाचा सेनासागर निजामशाहीवर कोसळणार होता. त्यावेळी निजामशाहीचे सैन्यबळ होते केवळ ३०,००० चे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शहाजी महाराज हे निजामशाहीचे एक मातब्बर सरदार होते. असा बाका प्रसंग असताना शहाजी महाराजांच्या खांद्यावर निजामशाहीच्या रक्षणाची जवाबदारी आली होती. शहाजी महाराजांनी निजामशाहीच्या ३०,००० सैन्यापैकी १०,००० सैन्य अहमदनगर ह्या राजधानीच्या ठिकाणच्या रक्षणासाठी नियुक्त करून उर्वरित सैन्य सोबत घेतले.
आदिलशाही आणि मोघल सैन्य अहमदनगर जवळील भातवडी गावी उतरले होते. एवढ्या प्रचंड सेनेसाठी अन्नधान्य, पाण्याची सोय व्हावी म्हणून भातवडी हे गाव निवडले गेले कारण इथे वाहणाऱ्या मेखरी नदीवर एक छोटेसे धरण बांधलेले होते. शहाजी महाराजांनी ह्याच संधीचा फायदा करून घेण्याचे ठरवले. रात्री सर्व सैन्य मुक्कामी असताना रातोरात दारुगोळा वापरून धरणाची भिंत उडवून देण्यात आली. आदिलशाही आणि मोघल सैन्य पूर्णपणे निद्रिस्त असताना अचानक पाण्याचा लोंढा छावणीत घुसू लागला. अचानक सैन्यात गडबड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सैन्यासाठी जमा केलेले अन्नधान्य, जनावरांसाठी असलेला दाणाचारा, युद्धाला लागणारा दारुगोळा सर्व काही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ लागले. कित्येक सैनिक निद्रिस्त असताना पाण्याच्या अचानक आलेल्या प्रवाहामुळे स्वतःला सावरू शकले नाहीत. नंतर आदिलशाही आणि मोघलांच्या उर्वरित सैन्यासोबत निजामशाहीच्या सैन्याचे शहाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली युध्द झाले. धरणाच्या पाण्यामुळे आदिलशाही-मोघल सैन्याचे झालेले अन्नधान्य दारूगोळ्याचे नुकसान, कमी झालेले सैन्यबळ आणि उरलेल्या सैन्याचे खचलेले मनोबल यामुळे या युद्धामध्ये आदिलशाही-मोघल सैन्याला फार मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
ह्या युद्धामध्ये मिळालेला अतुलनीय विजय आणि गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून बलाढ्य सैन्याला नामोहरम केल्यामुळे शहाजी महाराजांच्या नावाचा संपूर्ण हिंदुस्थानात दबदबा निर्माण झाला. मात्र ह्या युद्धादरम्यान घडलेली एक दुखःद घटना म्हणजे शहाजी महाराजांचे छोटे भाऊ शरीफजी महाराज यांना ह्या युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झाले. शरीफजी महाराज हे शहाजी महाराजांपेक्षा दोन वर्षांनी लहान होते. आज अहमदनगरपासून नगर-जामखेड रस्त्यावर २५ किमी अंतरावर असलेल्या छोट्याच्या भातवडी गावी शरीफजी महाराजांची समाधी स्थित आहे. समाधीचा काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला असून एका सुमारे ६ फुट उंच दगडी चौथर्यावर मध्यभागी छोटेसे शिवलिंग कोरलेले आहे. तरी अहमदनगर शहरास कधीही तुमचे जाणे झाले तर अवश्य वेळ काढून ह्या अन्यात युद्ध्भूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, शहाजी महाराजांचे छोटे बंधू शहाजी महाराजांच्या समाधी अवश्य दर्शन घ्यावे.