महाराष्ट्रामध्ये बेलाग आणि बुलंद डोंगरी गड-किल्ल्यांप्रमाणे अनेक भुईकोट किल्ले देखील पाहायला मिळतात. त्या पैकी एक आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये, पेडगाव येथे भीमा नदीच्या तीरावर वसलेला, ऐतिहासिक वारसा लाभलेला, यादवकालीन बहादूरगड किल्ला.
मोघल बादशहा औरंगजेबने आपला दूधभाऊ बहादूरखान कोकलताशला दख्खनला रुजू केले होते ते शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाई करण्यासाठी. बहादुरखानाने ह्या पेडगावच्या किल्ल्यामध्ये आपली मुख्य छावणी टाकली, किल्ल्याची डागडुजी करून किल्ल्याला आपले नाव दिले – बहादूरगड. औरंगजेबापाशी फार बढाया मारणारा हा बहादूरखान प्रत्यक्षात मात्र शिवाजी महाराजांविरुध्ध कोठेच यश मिळवू शकला नाही. ह्या बहादूरखानाने औरंगजेबाला नजर करण्यासाठी किल्ल्यामध्ये काही खजिना आणि उत्तम प्रतीचे 200 जातीवंत अरबी घोडे जमा केले होते.
हा खजिना काय बहादूरखानाने स्वकष्टाने व कर्तृत्वाने मिळवला होता ???
नक्कीच नाही. . . . स्वराज्यातील गोर-गरीब रयतेला लुबाडूनच हे धन कमावले होते आणि शिवाजी महाराजांनी हा खजिना लुटायचा ठरवलं. नुकताच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर अमाप खर्च झाला होता. तो भरून काढण्यासाठी जणू बहादुरखानाने महाराजांना आयती संधीच दिली होती.
महाराजांनी हा खजिना आणि घोडे लुटण्यासाठी एक विलक्षण योजना आखली. आपल्या सोबत निवडक नऊहजार सैन्य घेतले आणि आपल्या ९००० सैन्याचे २००० आणि ७००० अशी विभागणी केली. दोन हजार सैन्याने किल्ल्यावर हल्ला करायचा पण सात हजार सैन्याने मात्र हल्ल्यात भाग न घेता किल्ल्याच्या बाजूच्या घनदाट जंगलात लपून राहायचं असा बेत ठरला.
किल्ल्याच्या परिसरामध्ये महाराजांनी मुद्दाम हि लुटीची खबर आपल्या गुप्तहेरांकरवी पसरवली होती. त्यामुळे बहादूरखान आणि त्याचे सैन्य प्रतिकारासाठी पूर्ण जय्यत तयारीत होते. ठरलेल्या योजने प्रमाणे दोन हजार मावळ्यांनी किल्ल्यावर हल्ला चढवला खरा पण खरा उद्देश हा खजिना लुटणेहा होता. हे २००० सैन्य आपण युद्धध हरत आहोत असा बनाव करून, पराभूत होत आहोत असं भासवून पळून जाऊ लागले. हे पाहून बहादूरखान बेहद खुश झाला. आत्ता पर्यत अनेक वेळा मराठ्यांकडून पराभूत झालेल्या बहादूरखानाला आपला विजय होत आहे असं वाटत होत आणि म्हणून त्याने पळून जाणाऱ्या मावळ्यांचा पाठलाग सुरु केला.
शिवाजी महाराजांना नक्की हेच अपेक्षित होते. आता किल्ला पूर्ण रिकामा होता. बहादूरगड मधील बरेचसे सैन्य मावळ्यांच्या पहिल्या तुकडीच्या मागावर होते. आता किल्ल्यात केवळ बाजारबुणगे, काही तुरळक सैन्य आणि नोकरचाकर फक्त उरले होते. आजुबाजूच्या जंगलात लपलेल्या मराठा सैन्याच्या दुसऱ्या तुकडी साठी आता खजिना लुटणे काहीच अवघड नव्हते. अगदी सहजरित्या बहादूरगडमधील खजिना आणि उत्तम अरबी जातीवन्त २०० घोडी मराठी सैन्याला लीलया मिळाली.
इकडे मराठ्यांचा पाठलाग करून बहादूरखान थकून गेला आणि त्याने मावळ्यांचा पिच्छा सोडून परत बहादूरगडाकडे आपला मोर्चा वळवला. आणि येऊन बघतो तर काय. . . .
शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्याला सहजगत्या फसवून किल्ल्यातील खजिना साफ रिता केला होता. शिवाजी तर हातून गेलाच पण जमा केलेला खजिनाही बहादूरखान गमावून बसला होता. महाराजांच्या बुद्धीचातुर्यापुढे पराभूत झालेल्या ह्या पेडगावच्या शाहण्याला आता केवळ हात चोळत बसण्याशिवाय कोणताच पर्याय पर्याय शिल्लक नव्हता.