महाराष्ट्रातील असंख्य गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाचे मुक साक्षीदार. मात्र ह्या किल्ल्यांची सद्य परिस्थिती पाहता काही ठराविकच किल्ले असे आहेत जिथे विपुल प्रमाणात दुर्ग अवशेष पहायला मिळतात. त्यापैकीच एक समृद्ध आणि श्रीमंत किल्ला आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुकामधील अवचितगड किल्ला.
पुणे आणि मुंबई शहरापासुन अवचितगड किल्ला एका दिवसात सहज पाहुन होतो. पुण्यापासुन अंतर आहे सुमारे १४० किमी आणि मुंबई पासुन सुमारे ८० किमी.
पाली मार्गे रोहा शहराकडे जाताना सुमारे ७ किमी अलीकडे आहे मेढा नावाचे छोटेसे गाव आहे. हेच आहे अवचितगड किल्ल्याचे पायथ्याचे गाव. मेढा गावात असलेल्या विठ्ठल मन्दिरापर्यत उत्तम डांबरी गाडीमार्ग आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या पटांगणासमोर रस्ता सरळ आपल्याला दोन मोठ्या विहिरींपाशी घेऊन जातो. ह्या विहिरींच्या मागूनच सुरु होते अवचितगड किल्ल्याची सोपी चढण. मेढा गावापासून सुमारे ३ किमी पुढे असलेल्या पिगळसाई गावातूनही एक दुसरी वाट अवचितगडावर घेऊन जाते. मात्र तुलनेने मेढा गावातील वाट कमी वेळ आणि कमी कष्टाची आहे. मेढा गावातून गडाच्या प्रथम दरवाजापर्यत मळलेली पायवाट आहे. रस्ता चुकूनये म्हणून ठिकठिकाणी वृक्षांवर बाणाच्या खुणेने दिशा देखील दाखवली आहे. हि किल्ल्याची चढण जास्त दमछाक करणारी नसून वाटेमध्ये उंच वृक्ष असल्यामुळे ह्या मार्गात उत्तम सावलीदेखील असते.
सुमारे अर्ध्या-पाऊण तासाची सोपी चढण सम्पल्यावर गडाचे डाव्या वळणाचे गोमुखी प्रवेशद्वार नजरेस येते. प्रवेशद्वाराची कमान, आजूबाजूची तटबंदी व बुरुज अजूनही शाबूत असून डाव्या हाताला शरभाचे शिल्प कोरलेले दिसते. दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोर गडाचा प्रचण्ड विस्तार दिसतो आणि नजरेस येतात सर्वत्र पसरलेले अनेक पुरातन दुर्ग अवशेष. प्रवेशद्वारासमोरील पायर्यांच्या मार्गाने गडामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला पसरलेला गडाचा विस्तार नजरेस येतो.गडावरील जास्त दुर्ग अवशेष डाव्या बाजूला आहेत. तरी सर्वप्रथम उजव्याहाताला वळावे.येथे जराशी लांब पसरलेली गडाची एक सोंड दिसते आणि टोकाला एक बुरुज बांधलेला दिसतो. बुरुजापर्यतच्या मार्गामध्ये पुरातन वाड्याच्या पायाचे, पायर्यांचे आणि भिंतींचे अवशेष दिसतात. बुरुजावर टोकावर दिसतो उभारलेला भगवा ध्वज आणि एक मोठी तोफ. वाड्याचे अवशेष, बुरुज आणि तोफ पाहुन गडाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन आता डाव्या बाजूची पायवाट पकडावी.
थोडे अंतर चालल्यावर गडावरील सदरेचे अवशेष दिसतात. दोन टप्प्यांमध्ये बांधलेली प्रशस्त सदर आणि सदरेवर चढण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या येथे आढळतात. सदरेसमोरच अजुन एक तोफ ठेवलेली दिसते. सदरेपासून थोडे अंतर पुढे अजून चालल्यावर दिसते अवचितगडावरील सर्वात सुंदर ऐतिहासिक वास्तू – द्वादशकोनी तलाव. प्रत्येक किल्ल्यावर पाणीसाठ्यासाठी काहीतरी सोय नक्कीच असते. कातळात कोरीव टाक्या, खांबटाक्या, सपाटीवर खोदलेल्या टाक्या, छोटे-मोठे तलाव देखील दिसतात. मात्र अवचितगडावर तुम्हाला पाहायला मिळेल एक मोठा तलाव ज्याच्या बाजूने बारा कोन असलेले भिंतींचे बांधकाम आहे. आत उतरायला एका बाजूने सुंदर पायऱ्या आहेत. राजगडावरील पद्मावती, किंवा रागडावरील गंगासागर तलावपेक्षाही मोठा आहे हा अवचितगडावरील द्वादशकोनी तलाव. ह्या तलावासमोर पोहोचल्यावर त्या अन्यात स्थापत्यकाराला नमन करावेसे वाटते ज्याने ज्या सुंदर जलसाठ्याची बांधणी केली असावी. समान लांबी रुंदीच्या बारा बाजू, त्यांमधे असलेले बारा कोन, त्यांमध्ये असलेला मोठा जलसाठा आणि याआत उतरायला असलेल्या कोरीव पायऱ्या. एखाद्या किल्ल्यावर तुम्हाला गोलाकार, चौकोनी किंवा ओबडधोबड खोदकाम करून तयार झालेला तलाव तुम्हाला पाहायला मिळेल पण अवचितगडावर असलेला द्वादशकोनी तलाव केवळ अद्वितीय.
तलावाचे हे सौन्दर्य डोळ्यात साठवुन पुढे गेल्यास एक छोटे शन्कराचे मन्दिर दिसते. मंदिराच्या समोर अनेक देव देवतांच्या पुरातन मुर्त्या देखील ठेवल्या आहेत. तलावाच्या मागील बाजूस थोडासा उतार आहे. तिथुन खाली उतरल्यावर खडकात खोदलेल्या आयताकृती एकूण ७ टाक्यांचा समुह दिसतो. ह्या टाक्यांच्या समोर एक वीरगळ दिसते. टाक्यांच्या समोरच चोर दरवाजा आहे मात्र सध्या पूर्णपणे गाळ चिखलाने बुजून गेला आहे. टाक्यांच्या समोर उभे राहिल्यास डाव्या आणि उजव्या बाजूला थोडे अंतर चालल्यावर दोन दिंडी दरवाजे दृष्टीस येतात. महाराष्ट्रात असे फारच कमी किल्ले असतील जिथे मुख्य प्रवेशद्वार आणि चोर दरवाजा व्यतिरिक्त गडाच्या मध्यभागी अंतर्गत वापराचे छोट्या आकाराचे दिंडी दरवाजे देखील आहेत. उजव्या बाजूच्या दिंडी दरवाजाबाहेर अजुन एक मोठी तोफ दिसते.
परत मागे वळुन डाव्या बाजूच्या दिंडी दरवाजाने किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरील बुरुजपर्यत सरळ चालत जाता येते. ह्या मार्गातही अनेक पुरातन बांधकामाचे अवशेष, वाड्याच्या भिंती, गडाची तटबंदी नजरेस येते. ह्या दुसऱ्या टोकावरील बुरुजाचे बांधकामही लक्षणीय आहे. बुरुजावर चढायला तटबंदीच्या तळापासून पायऱ्या बांधल्या असुन बुरुजावर टेहळणी साठी बरीच मोकळी जागा दिसते. बुरुजाच्या मधोमध झेंड्याची जागा असुन बाजूलाच एक शिलालेख कोरलेला दिसतो.
सर्व बाजूंनी तटाबुरुजांनी वेढलेला अवचितगड किल्ला इतिहासामध्ये उत्तर कोकणच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा किल्ला होता. आभाळ निरभ्र असल्यास सरसगड, तैलबैला, सुधागड हे किल्ले आणि सवाष्णीचा घाट ह्या पुरातन घाटमार्गावर अवचितगडावरून स्पष्ट टेहळणी करता येत असे. गडाचा गोमुखी महादरवाजा, सदरेचे अवशेष, पुरातन बांधकामाच्या पायाचे अवशेष, बांधकामाच्या उंच मोठाल्या भिंती, अद्वितीय द्वादशकोनी तलाव, खडकातील सात खोदीव टाक्या, एक वीरगळ,दोन दिंडी दरवाजे, तीन तोफा, एक पुरातन शिलालेख, दोन मोठाले बुरुज आणि सर्वबाजूने पसरलेली भक्कम तटबंदी असा पुरातन दुर्गावशेषांचा खजिना पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदातरी अवचितगडाची मोहीम नक्कीच आखावी.