मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक प्रबळ हिंदू राजसत्ता भारतामध्ये राज्य करत होत्या. यापैकी आपल्या अजोड पराक्रमाने सुमारे ४५० वर्षे महाराष्ट्रात आधिपत्य गाजवणारी राजसत्ता म्हणजे यादव साम्राज्य. महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर यादव कालीन मंदिरे आणि काही गडकिल्ल्यांवर देखील यादव कालीन स्थापत्य शैलीतील बांधकाम आढळते. असाच एक पुरातन किल्ला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर शहरापासून केवळ १० किमी अंतरावर असलेला डुबेरगड. सुमारे आठव्या शतकामध्ये यादव साम्राज्यातील सेऊणचंद्र राजाने सेऊणपुरा हे शहर वसवले. सेऊणपुराचेच सध्याचेच नाव आहे सिन्नर. देवगिरी हि यादव साम्राज्याची राजधानी होण्या आधी सिन्नर हि यादवांची राजधानी होती. राजधानीच्या संरक्षणार्थ आणि सिन्नरकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी डुबेरगडाची निर्मिती झाली असावी.
डुबेरगाव ह्या पायथ्याच्या गावापासून थोड्याशा दूरवर असलेल्या एका छोट्या डोंगरावर डुबेरगड किल्ला स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याला नागेशवर मंदिर आणि जनार्दन स्वामींचा छोटासा आश्रम आहे. खासगी वाहनाने आश्रमपर्यंत थेट जात येते. येथे आश्रमात विंनती केल्यास रात्री मुक्कामाची सोय होऊ शकते. नागेशवर मंदिराच्या बाजूनेच किल्ल्यावर जाण्यासाठी बांधलेला उत्तम पायर्यांचा मार्ग आहे. पायथ्यापासून किल्ल्याची उंची जास्त नसल्याने केवळ वीस मिनिटात गडमाथा गाठता येतो. किल्ल्याची पायथ्यापासून कमी उंची आणि सोपी चढण असल्याने किल्ला चढणीचा त्रास जाणवत नाही.
किल्ल्याचे पठार मात्र प्रशस्त आहे. पायर्यांच्या मार्गाने गडमाथ्यावर प्रवेश करताच उजव्या हाताला खडकात खोदीव पाण्याच्या दोन आयताकृती टाक्या दिसतात. गडाच्या मध्यभागी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. सध्या गावकर्यांनी देवळाची डागडुजी केली असून मंदिरातील मूर्ती हुबेहूब सप्तशृंगी गडावरील देवीप्रमाणे स्थापन केली आहे. मंदिराबाहेर एक दगडी दीपमाळ देखील आहे. मंदिर पाहून गडाच्या विरुद्ध दिशेला चालत गेल्यास एक भला मोठा तलाव दृष्टीस पडतो. गडाच्या मध्यभागी एका पुरातन बांधकामाच्या पायाचा चौथरा आहे. तिथे एका पीराचे थडगे बांधलेले आढळते. आजमितीस केवळ एवढेच दुर्गावशेष डुबेरगडावर पहायला मिळतात. किल्ल्याची चढाई व वरील सर्व पुरातन अवशेष पाहायला एक तास आरामात पुरतो.
खेदाची बाब अशी कि आजमितीस डुबेरगडावर कोणतेही यादवकालीन अवशेष पाहायला उपलब्ध नाहीत. खडकातील खोदीव टाक्यांची रचना देखील यादवकालीन नसून शिवकालीन वाटते. सिन्नर नन्तर देवगिरी हि यादवांची नवीन राजधानी बनल्यानन्तर डुबेरगडाचे महत्व कदाचित कमी झाले असावे. तसेच तेराव्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणांनंतर यादव साम्राज्य मोडकळीस आले. थेट सोळाव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याच्या उदयापर्यंत अनेक परकीय राजसत्ता महाराष्ट्रामध्ये होईन गेल्या. ह्या कालखंडामध्ये डुबेरगडावरील यादव कालीन दुर्गावशेष देखील काळाच्या ओघात नामशेष झाले असावे. आजीमितीस पायथ्यापासून बांधलेल्या पायर्यांच्या सोप्या मार्गामुळे डुबेरगडाचा माथा गाठणे सोपे झाले आहे. तसेच खासगी वाहनाने योग्य नियोजन केल्यास डुबेरगडासोबत पट्टागड, औंधा आणि बितनगड हे किल्लेही दोन दिवसात पाहता येतात.
डुबेरगडाच्या पायथ्याला असलेल्या डुबेरगावचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे आहे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे जन्मगाव. ज्या वाड्यामध्ये बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला तो वाडा आजही गावामध्ये पाहायला मिळतो. सध्या बर्वे कुटुंबाकडे वाड्याची मालकी असल्यामुळे डुबेरगावामध्ये ह्या वाड्यास बर्वे वाडा म्हणतात. वाड्याच्या उंच भिंती, चहुबाजुचे बुरुज, नक्षीदार कमान असलेली दोन प्रवेशद्वारे, आतील लाकडी बांधकामावरील कोरीवकाम आवर्जून बघण्यासारखे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याला प्रत्यक्षात उतरवलेल्या ह्या अद्वितीय योध्दयाचे हे जन्मस्थळ अवश्य पहावे. तसेच सिन्नर शहरामध्ये आहे यादव कालीन हेमाडपंथी गोंडेशवर मंदिर. सिन्नर शहर हे यादव साम्राज्याची राजधानी असताना ह्या सुंदर मंदिराची बांधणी केली असावी. डुबेरगडाच्या भेटीदरम्यान हि दोन ठिकाणे बघितल्यावरच तुमची दुर्गदर्शन मोहीम खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.