शिवपूर्व काळापासून मुंबई बंदरावर इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांच्या व्यापारी मार्गावर आणि साम्राज्यविस्तारावर पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना एका बळकट जलदुर्गाची गरज होती. त्यामुळे अलिबागच्या उत्तरेला सुमारे १० मैलावर समुद्रामध्ये एका बेटावर महाराजांनी जो मजबुत किल्ला उभारला तो म्हणजे जलदुर्ग खांदेरी.
खांदेरीला भेट देण्यासाठी अलीबाग पासून ८ किमी वरील थळ हे गाव गाठावे. थळच्या किनाऱ्यापासुन खांदेरी पर्यत होड्यांची सोय आहे. सुमारे अर्ध्यातासाचा जलप्रवास करून आपण खांदेरी किल्ल्यावरील बोटीच्या धक्क्याला लागतो. ह्या प्रवासामध्ये दुरूनच आपल्याला खांदेरी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यामध्ये बांधलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे दिपगृह नजरेस येते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सध्या नामशेष झाले आहे. येथे सिमेंटचे बांधकाम करून बोटींसाठी उतरायला धक्का बांधलेला दिसतो. बोट जिथे किल्ल्याच्या धक्क्यावर थांबते तिथे बोटीचे दोरखंड बांधायला चक्क दोन तोफा जमिनीमध्ये निम्म्या पुरलेल्या दिसतात. मात्र तटबंदी सुस्थित असुन तटबंदीवरुन चालत पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते.
किल्ल्यामध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला वेताळाचे मन्दिर दिसते. मंदिरामध्ये एक भलीमोठी पांढऱ्या रंगाची शीळा आहे. हि शीळा दरवर्षी आकाराने थोडी थोडी मोठी होते अशी येथील स्थानिक लोकांची मान्यता आहे. किनाऱ्याच्या परिसरातील कोळी समाजातील गावकरी मासेमारीला जाण्याआधी, कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी किंवा कोणताही लग्नसमारंभ असल्यास वेताळाचे दर्शन घेऊन, नेवैद्य दाखवूनच आपले काम सुरु करतात. म्हणुन ह्या वेताळाच्या दर्शनासाठी किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असते. मंदिराच्या परिसरामध्ये नैवेद्यसाठी सर्रास चालणारी प्राणिहत्या, मांसाहार आणि सोबत लोकांचे चालू असलेले मद्यप्राशन पाहुन वाईट वाटते. तसेच किल्ल्याच्या तटबंदीच्या दगडांवर अनेक लोकांनी खडूने, चुन्याने आपली नावे लिहुन फार विद्रुपीकरण केलेले दिसते. इथे सर्रास चालणारा मांसाहार आणि मद्यप्राशन याबाबत मात्र शासनानेकठोर नियम करणे गरजेचे आहे. ह्या प्रकारांमुळे एका ऐतिहासिक स्मारकाचे महत्व कमी झाल्याची खन्त नक्कीच जाणवते.
वेताळ मंदिराच्या मागील बाजुने तटबंदीवरुन खांदेरीच्या गडफेरीला सुरवात करावी. किल्ल्याची भरभक्कम आणि रुंद तटबंदी अजूनही बऱ्यापैकी सुस्थित आहे. पूर्ण गडफेरीमध्ये खांदेरी किल्ल्याच्या बुरुजांवर ठेवलेल्या एकुण सहा तोफा दिसतात आणि विशेष म्हणजे ह्यांपैकी तीन तोफा गाड्यांसाहित पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये दोन पाण्याच्या खोदीव टाक्या आहेत मात्र येथील पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यामध्ये एक छोटे शन्कराचे आणि मारुतीचे मंदिरही दिसते. तटबंदीवर एक हेलिपॅड बांधलेले दिसते आणि हेलिपॅडच्या खाली समुद्राकडे जाणारा छोटासा दरवाजा आहे. काही ठिकाणी तटबंदीच्या खाली बांधलेली कोठारे दिसतात. किल्ल्याच्या दक्षिण दिशेला १८६६ मध्ये उभारलेले दीपगृह आहे. दिपगृहाची कार्यप्रणाली आतुन पाहण्यासाठी प्रवेश फी द्यावी लागते. दिपगृहाच्या गेट समोरही दोन तोफा ठेवल्या आहेत. हे सर्व दुर्गावशेष पाहुन गडफेरी सम्पवुन परत बोटीच्या धक्कयापाशी यावे.
सन १६७२ साली शिवाजी महारांनी एक बळकट जलदुर्ग बांधण्यासाठी हे बेट हेरले आणि येथे किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. हि बातमी समजताच मुंबईचे इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी खांदेरी बेटावर हल्ला चढवला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे बांधकाम तात्पुरते थांबवले. पुढे १६७९ साली मायनायक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली १५० लोकांचा ताफा घेऊन किल्ल्याचे बांधकाम मराठ्यांनी परत सुरु केले. ह्यावेळी देखील इंग्रज आडकाठी घालताच होते. थळच्या समुद्रकिनाऱ्यावर मराठ्यांचा खुबलढा नावाचा एक किल्ला होता. सद्य स्थितीमध्ये ह्या किल्ल्याचे कोणतेही अवशेष अस्तित्वात नाहीत. तर ह्या खुबलढा किल्ल्यावरून मराठ्यांच्या आरमारातील अधिकारी दौलतखान यांनी इंग्रजांना थोपवून धरले आणि किल्ल्याचे बांधकाम सुरळीत चालू ठेवले. थळच्या किनाऱ्यापासुन खांदेरी बेटापर्यतच्या भागात इंग्रज नौका पहारे देत असत. मात्र इंग्रजांना चकवा देत मराठ्यांच्या नौका किनाऱ्यापासुन बेटा पर्यत अन्नधान्य, रसद, दारुगोळा पुरवत. ह्या सर्व धामधुमीमध्ये इंग्रजांची डोव्ह नावाची एक मोठी युद्धनौका मराठ्यांनी जिंकून घेतली. इंग्रज स्वतःला समुद्रावरील सर्वात बलशाली सत्ताधीश समजत होते मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केलेच. अखेर १६८० मध्ये इंग्रजांनी मराठ्यांसोबत तह केला आणि माघार घेतली.
खांदेरी किल्ल्याच्या भौगोलिक स्थानामुळे मुंबई पासून दक्षिणेकडे जाणारे इंग्रजांचे कोणतेही गलबत मराठ्यांच्या तोफेच्या टप्प्यात येत असे. १७०१ मध्ये जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाने आणि १७१८ मध्ये परत इंग्रजांनी खांदेरी किल्ल्यावर हल्ला केला मात्र मराठ्यांच्या चिवट प्रतिकारापुढे दोघांनाही हात हलवत जावे लागले. पुढे १८१४ मध्ये खांदेरी किल्ला पेशवाई मध्ये शामील झाला. अखेर १८१८ मध्ये सम्पुर्ण हिंदुस्थानासमवेत खांदेरी किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
काही वर्षांपूर्वी खांदेरी किल्ला पाहण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट ची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र आता त्याची गरज नसल्यामुळे खांदेरीला जाणे सहज शक्य आहे. मात्र स्थानिक लोकांकडून चालणारा किल्ल्यावरील मांसाहार, प्राणिहत्या, मद्यपान आणि किल्ल्याचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी कडक नियमांची अमलबजावणी होणे गरजेचे आहे. एकेकाळी इंग्रज, सिद्दी ह्या परकीय सागरी शत्रूंची झोप उदावणाऱ्या खांदेरी किल्ल्यावर होणारे हे प्रकार पाहून खरचं वाईट वाटते.