मुळशी धरणाच्या आजूबाजूला जो मावळ भाग आहे त्याला कोरस मावळ असे म्हणतात. इथून पूर्वी कोकणात उतरायला भोरप्याची नाळ, सवाष्णीचा घाट, नाणदाड घाट ह्या घाटवाटा होत्या. ह्या वाटांवर टेहळणी करायला आणि कोरसमावळच्या संरक्षणासाठी इथे काही किल्ल्यांची रचना करण्यात आली. त्यापैकी एक छोटासा किल्ला म्हणजे घनगड.
लोणावळा शहरापासून सुमारे 40 किमी वर असलेले एकोले, हे पायथ्याचे गाव. शहरी जीवनापासून पूर्णपणे अलिप्त असलेले, चहुबाजूने उंच डोंगरांनी वेढलेले हे एक सुंदर खेडेगाव आहे. एकोले गावी जायला लोणावळा पासून सहारा अँबी व्हॅली कडे जाणार रस्ता पकडावा. कोरीगडच्या पायथ्याचे पेठ शहापूर गाव सोडल्यास उजवीकडे एक डांबरी रस्ता लागतो तो थेट भांबुर्डे गावात आणि पुढे सरळ एकोले गावात घेऊन जातो. ह्या रस्त्यामध्ये दुतर्फा मोठाले डोंगर आणि दाट अरण्य आहे. खासकरून पावसाळ्यात ह्या प्रवासाची माजा काही औरच असते. असा सुंदर प्रवास केल्यांनंतर एकोले गावात डाव्या हातालाच आहे छोटासा घनगड किल्ला. मध्यावर आणि सर्वोच्च ठिकाणी असलेली तटबंदी एकोले गावातूनही स्पष्ट नजरेस येते. इथून किल्याची उंची जास्त नाही. सुमारे तासाभरात गडमाथा गाठता येतो.
गावातूनच एक मळलेली पायवाट आपल्याला घनगडावर घेऊन जाते. सुमारे अर्धातास चालल्यावर दिसते गारजाई देवीचे मन्दिर. ह्या पुरातन मन्दिराची आता डागडुजी केल्यामुळे मुक्कामाला हि एक उत्तम जागा उपलब्ध आहे. मंदिरापासून डाव्या हाताला एक छोटीशी पायवाट थेट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते.
गडाचा प्रथम दरवाजाची कमान पूर्णपणे ढासळून गेली आहे. खडकातील खोदीव पायऱ्या चढून गडात प्रवेश करावा. प्रवेशद्वारापाशी असलेले दोन बुरुज बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत.
आत प्रवेश केल्यावर समोरच कड्याच्या कातळात खोदलेल्या दोन लेणी सदृश्य खोल्या नजरेस पडतात. उजव्या हातास थोडेसे अंतर चालल्यावर एका छोट्याश्या कपारीमध्ये सुंदर देवीची मूर्ती दिसते. इथून पुढे गड पाहण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नाही. परत पूर्वठिकाणि प्रवेशद्वारापाशी येऊन डाव्या बाजूचा रस्ता पकडावा.
इथून वरील शेवटची सुमारे १५-२० मिनिटांची चढण काहीशी अवघड आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी इथे सुमारे १५ फूट उंचीचा एक सरळसोट कडा चढावा लागतो. कडाचढल्यावर देखील केवळ एका बारीक केबल च्या आधाराने डोंगराच्या कड्याला वळसा मारावा लागतो. नन्तर पुढे जाण्यासाठी पायवाट दिसते. हा आहे घनगड किल्ल्यावरील एक प्रस्तारोहण करण्याचा थरारक अनुभव. मात्र आता एका दुर्ग संवर्धन संस्थेने १५ फुटी कड्यापाशी एक लोखन्डी शिडी लावल्याने हि चढण जरा तरी सोपी झाली आहे. आधी तर इथे दोरी लावूनच कडा चढावा लागत होता. तरीही खबरदारी बाळगावी. पावसाळ्यात शिडी चढताना पाय सटकणार नाही याची काळजी घ्यावी. केबलला धरून जाताना काही अंतरावर, केवळ पायाचा पंजा बसेल एवढीच जागा उपलब्ध आहे. डावीकडे थोडी खोल डोंगरकपार आणि उजवीकडे उभा डोंगर. तरी ह्या एवढ्या चढणीमध्ये जरा खबरदार रहावे.
गडाच्या सर्वोच्च ठिकाणी जाताना वाटेत अनेक पाण्याच्या टाक्या दिसतात. गडावर सुमारे ४-५ पाण्याच्या टाक्या आहेत मात्र पाणी पिण्यायोग्य नाही. गडमाथ्यावर टेहाळणीचे बुरुज दिसतात. तैलबैला, सुधागड, सरसगड हे किल्लेही स्पष्ट दिसतात. गडमाथ्यावर आपल्याला घनगडाचे भौगोलिक महत्व समजते. जिथुन कोरसमावळ आणि कोकणातल्या घाटवाटा दोन्हीवर निरीक्षण करता येऊ शकते अशा मोक्याच्या जागी घनगड किल्ल्याची उभारणी केली आहे.
पुरंदरच्या लढाईत झालेल्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यामध्ये घनगडाचा समावेश होता. पेशवेकाळात कान्होजी आंग्रेंकरवी घनगड शाहु राजांकडे शामील झाला. तेव्हा गडाचा कैदीखाना म्हणूनही वापर केला जात असे.
लोणावळा जवळील सर्वच किल्ले तसे चढायला सोपे आहेत. मात्र जरा वाट वाकडी करून एक दुर्ग भ्रमन्तिचा काहीसा वेगळा अनुभव घनगड किल्ला आपल्याला देतो. आडवाटेवरील कोरसमावळाचा हा पहारेकरी ट्रेकर्सना मात्र नेहमी खुणावत असतो.